मुंबई : राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं नेहमी सांगितलं जातं. पण ठाकरे गटाचे खासदार शिवसेना खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांची शाळा घेत परवानगी घेतल्याशिवाय यापुढे अशी समारंभांना जायचे नाही, अशी ताकीद दिली. आदित्य ठाकरे यांच्या या तंबीने ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. राजकारणात अनेक संबंध हे राजकारणाच्या पलिकडे असतात. अनेक नेतेमंडळी राजकीय व्यासपीठावर एकमेकांचे कट्ट्रर विरोधक असले तरी ते खासगी आयुष्यात मित्र असू शकतात. हे सांगत या खासदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या मैत्रीचे उदाहरण दिलं आहे.
खासदारांवर आदित्य यांची नाराजी?
दिल्लीत शिवेसनेचे प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. केंद्रीय मंत्र्यांच्या निमंत्रणावरून ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावली. त्यात परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश आष्टीकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थिती लावली. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या घरी शिवसेनेचे खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. त्या स्नेहभोजनाला शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे उपस्थित होते. खासदारांच्या या भोजनावळीमुळे शिवसेनेशी जवळीक वाढतेय का? अशी ठाकरेंना भिती असावी. जवळीक वाढल्यास 'ऑपरेशन टायगर'ला बळ मिळण्याची ठाकरेंना चिंता असावी. विरोधकांच्या आमिषाला खासदार बळी पडू नयेत म्हणून ठाकरेंची खबरदारी पाहायला मिळाली.
हेही वाचा : छगन कमळ बघ; मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य
ठाकरे गटाला शिवसेनेच्या आमदार-खासदारांशी संबंध नकोत असे अप्रत्यक्ष आदेश आदित्या ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना दिले आहेत. यामुळे ठाकरे गटात त्यांच्या कुटुंबाप्रती असलेली नाराजी अधिक वाढण्याचीच अधिक शक्यता आहे. याआधी ठाकरे कुटुंबाच्या वागणुकीमुळेच ठाकरे गट सोडल्याचे कारण आत्तापर्यंत ठाकरेंना 'अखेरचा जय महाराष्ट्र'करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहेत. अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या कार्यपध्दतीवर त्यांच्या हम करे सो कायदा या वृत्तीवर आक्षेप घेतले आहेत. आता एखाद्या खासदार वा नेत्यांच्या घरी जेवायला जाण्यापूर्वी परवानगी घ्यायची हे आदेश ठाकरेंच्या खासदारांना मान्य नसल्याने त्यांनी खासगीत याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा वैरी नसतो. पण आदित्य ठाकरे यांनी खासदरांना बंद दाराआड दिलेल्या तंबीने महाराष्ट्रातील राजकारण यापुढे अधिक कलुषित होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होतंय.