छत्रपती संभाजीनगर: शेतकरी आणि उद्योजकाला तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 50 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगर येथील चंद्रभान वटाणे हे मूळचे परतूर तालुक्यातील वालखेड येथील रहिवासी आहेत. नातवंडांच्या शिक्षणासाठी ते 2021-22 दरम्यान पुण्यात ये-जा करत होते. याच काळात त्यांची ओळख पुण्यातील अनिल गोविंदा शिंदे या इसमाशी झाली. शिंदेने दुबईत स्वतःची कंपनी असून तो ट्रस्ट, गोशाळा आणि नव्या कंपन्यांना निधी पुरवतो, असे सांगत 5 लाख रुपये गुंतविल्यास 15 लाख मिळतील, असा लालच दिला.
हेही वाचा:धक्कादायक! महाराष्ट्रात 19 वर्षांच्या महिलेने बसमध्ये दिला बाळाला जन्म
वटाणे यांनी आपल्या ओळखीचे रमेश पाईकराव यांची ‘समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी’ असल्याची माहिती शिंदेला दिली. त्यानंतर शिंदेने पाईकराव यांच्याशी संपर्क साधला. पाईकराव यांनी कंपनीची कागदपत्रे आणि दोन कोरे बाँड शिंदेला दिले. तसेच वटाणे यांच्यासह विलास शेळके, युवराज चावरे, देवाशिष प्रधान, आबासाहेब चिंतामणी यांनी मिळून 18 मार्च रोजी एकूण 50 लाख रुपयांची रक्कम शिंदेला दिली. त्यावर शिंदेने दीड कोटी रुपये परत देण्याचे आश्वासन दिले.
शिंदेने वटाणे व पाईकराव यांना सिडकोतील एसबीआय बँकेसमोर बोलावून, 'कॅनरा बँकेच्या आरटीजीएसने पैसे पाठवतो, फॉर्म भरा' असे सांगितले. मात्र, दोघेही तब्बल तीन तास बँकेत थांबले तरी रक्कम मिळाली नाही.
शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वटाणे यांनी पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आणि सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.