भंडारा: भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणावर बोगस खत सापडल्याने खळबळ उडाली आहे. कृषी विभागाने तपासादरम्यान 129 मॅट्रिक टन ‘ब्रह्मास्त्र’ नावाचे खत बोगस असल्याचे उघडकीस आणले. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाजार समितीच्या सचिवाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र संबंधित कंपनीचा मालक आणि वितरक अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तपासाअंती समोर आले की, लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात ‘ब्रह्मास्त्र’ नावाचे खत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यातील 821 बॅग शेतकऱ्यांना विकण्यात आल्या होत्या. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने घेत तपासणीस पाठवले असता, खत दर्जाहीन व निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानंतर गुणवत्ता अधिकारी विजय हुमणे यांनी लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा: बापरे! पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतःच कबुल केली 'ही' धक्कादायक गोष्ट; नेमकं काय म्हणाले?
या तक्रारीच्या आधारे लाखनी पोलिसांनी गुजरातमधील भावनगर येथील कंपनी मालक, नागपूर येथील वितरक आणि कृषी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्याच नावाने कृषी केंद्राचे लायसन्स असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कंपनी मालक आणि वितरक यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.
विशेष म्हणजे, हे खत बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय मागवले गेले का, यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सचिवाने कोणत्या अधिकारात खत मागवले, याची चौकशी केली जात आहे. यामध्ये आणखी कोणी दोषी आहेत का, हे तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा हा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रशासन अलर्ट झाले असून, जिल्ह्यातील इतर कृषी केंद्रांचीही तपासणी करण्यात येत आहे. निकृष्ट खत विक्रीमुळे शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.
हे प्रकरण कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, भविष्यात अशा घटनांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे.