भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई झाली असून उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश महसूल व वन विभागाने जारी केला असून या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासनाने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, सदर अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अवैध वाळू उत्खनन व त्याच्याशी संबंधित अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या तपासणीनंतर दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली होती.
हेही वाचा : गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार
या कारवाईच्या पार्श्वभूमीवरसंबंधित अधिकाऱ्यांकडून न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मुंबई येथील प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या नागपूर खंडपीठात पूर्वसूचना (caveat) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणतेही एकतर्फी आदेश लागण्यापूर्वी शासनाला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान वाळू उत्खनन प्रकरणांतील कारवाईस शासन गंभीरपणे घेत असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट होते.