विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाच्या किंमती आणि कर्जबाजारीपणा यामुळं शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटनांचं सत्र महाराष्ट्रात सुरूच आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या. निसर्गाच्या लहरीपणासोबत सरकारच्या उदासीन धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यात मराठवाड्यातील 501शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. यात सर्वाधिक म्हणजे 124 घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. तर, गेल्या वर्षभरात मराठवाड्यातील 948 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न तोकडे पडत असल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम आहे. याच मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने अनेक शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही. यासह इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा: अपहरणाचा प्रयत्न पण आजीमुळे वाचला जीव
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील दावरवाडी तांडा येथील लिलाबाई सुभाष राठोड या महिलेने तीन वर्षांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. मात्र आत्महत्या केल्यानंतर सरकारकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येते. परंतु अनेक ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहे. सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षे पाठपुरावा करूनही या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली नसल्याचे मृतांचे वारस राहुल राठोड यांनी म्हटलं आहे.
जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या, जानेवारी ते 26 जून 2025 अखेर
छ.संभाजीनगर 87
जालना - 28
परभणी - 61
हिंगोली - 31
नांदेड - 72
बीड - 124
लातूर - 36
धाराशिव - 62
अशी एकूण 501 आत्महत्या झाल्या आहेत.
हेही वाचा: 'कोरोना लसीचा हृदयविकाराशी काहीही संबंध नाही'; सरकारचे मोठे विधान
राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज राज्यात सरासरी 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. राज्यात मराठवाड्यात शेतकरी कर्जबाजारीपणा, शेतीचा वाढता खर्च, शेतमालाला मिळणारा अल्पभाव, नापिकी, खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं प्राध्यापक डॉ.चंद्रसेन कोठावळे यांनी म्हणाले.
गेल्या सहा महिन्यात मराठवाड्यातील 501 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात जानेवारी महिन्यात विभागात 88 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात 75, मार्च 110, एप्रिल 89, मे 76 तर जून महिन्यात 63 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 124 दुर्दैवी घटना घडल्या असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 87 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अन्य जिल्ह्यांतही शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम आहे. दरम्यान आतापर्यंत 297 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली असून, 144 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.