मुंबई : 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...', याचा जयघोष करत आज आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचा उत्सव साजरा केल्यानंतर आधी दीड दिवसांचा, नंतर पाच दिवसांचा, पुढे सात दिवसांचा आणि आज अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गणपती मिरवणूक निघणार असून सर्वत्र बाप्पाच्या नामाचा जयघोष घुमणार आहे.
हेही वाचा : Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीचे महत्व काय ?, या दिवशी हे 5 सोपे उपाय नक्की करा, जाणून घ्या...
मुंबईसह, कोकणात आणि राज्यातही गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. घरगुती गणरायासह सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा भाविकांना पाहायला मिळणार आहे. मुंबईत घरगुती गणपतींसाठी ठिकठिकाणी महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मोठा गणपती मूर्तींचे विसर्जन तलावांसह समुद्रात केले जाणार आहे. विसर्जन आणि मिरवणूक सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेसह, पोलीस व वाहतूक पोलीस व्यवस्था सज्ज तैनात करण्यात आली आहे. हा सोहळा निर्विघ पार पडावा, याची काळजी हे प्रशासन घेत असून याकरता सर्वतोपरी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.