मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले. सर्वसामान्य जनतेपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. बुधवारी, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मनसे नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी भेट दिली.
अशातच, गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यादरम्यान, एकनाथ शिंदेंनी असे विधान केले आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन सस्पेन्स निर्माण झाला आहे.
आमच्यात जी चर्चा झाली ती...
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'राज की बात राजही रहने दो'. पुढे शिंदें म्हणाले की, 'आमची चर्चा खाजगी राहू द्या. काही लोकांना आता स्नेहसंबंध आठवले आहे, मात्र आमचा स्नेह आधीपासूनच आहे', असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी लगावला. 'आमच्यात स्नेह असल्याने भोजनही लवकरच होईल', असंही एकनाथ शिंदे म्हणाले.