Gold rate: सोन्याच्या किंमतीत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ₹35,500 इतकी घसरण झाली आहे. यामुळे 10 ग्रॅमच्या दरात ₹3,550 ची घट झाली. सध्या भारतात शनिवार आणि रविवारी (मे 17 आणि 18) सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर ₹95,130, २२ कॅरेटचा ₹87,200 आणि 18 कॅरेटचा ₹71,350 इतका आहे.
दर घसरणीमागील कारणं काय?
एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, जागतिक व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास सुधारल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी कमी झाली. त्यातच अमेरिका आणि चीन यांच्यात ९० दिवसांची तात्पुरती टॅरिफ शिथिलता झाली आहे. यानुसार, अमेरिका चीनवरील टॅरिफ 145% वरून 30% पर्यंत खाली आणणार आहे आणि चीन अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ 125% वरून 10% वर आणणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची भीती कमी झाली आहे.
जिओपॉलिटिकल स्थितीही स्थिर
भारत-पाकिस्तान सीझफायर कायम राहिल्यामुळे आणि रशिया-युक्रेन संघर्षात थोडीशी शांतता दिसल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झाला. मात्र, रशिया-युक्रेन चर्चेत अनिश्चितता अजूनही असल्यामुळे धोका पूर्णपणे टळलेला नाही.
अर्थव्यवस्थेचा प्रभाव
अमेरिकेतील एप्रिल महिन्यातील महागाई दर (CPI) 2.3% इतका आला आहे, जो फेब्रुवारी 2021 नंतरचा सर्वात कमी दर आहे. यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदर दोन वेळा कमी करू शकतो, अशी शक्यता आहे. तरी फेड चेअर जेरोम पॉवेल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे की, वारंवार होणाऱ्या पुरवठा अडचणीमुळे महागाई अस्थिर होऊ शकते.
गुंतवणूकदारांचा कल कसा आहे?
जरी किंमती घसरल्या तरी गुंतवणूकदारांनी सोन्यात रस दाखवला आहे. एप्रिलमध्ये सोन्याच्या ईटीएफमध्ये 115 टन शुद्ध गुंतवणूक झाली; जी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. विशेषतः चिनी गुंतवणूकदार यामध्ये आघाडीवर आहेत.
या आठवड्यातील संभाव्य किंमत दिशा (18 मे ते 24 मे):
या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ₹88,000 ते ₹95,000 दरम्यान राहू शकतो, तर चांदी ₹91,000 ते ₹98,000 दरम्यान व्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधपणे व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असून जागतिक परिस्थिती, आर्थिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा कल यावर या दरांचे भविष्य ठरणार आहे. सध्याच्या घसरणीचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे.