Zero Toll Tax: भारतातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतू वरील इलेक्ट्रिक वाहनांना टोल सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता इलेक्ट्रिक चारचाकी खाजगी वाहने आणि इलेक्ट्रिक बसेसना अटल सेतूवरून टोल न देता प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. ही घोषणा महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा, 1958 अंतर्गत करण्यात आली असून, यामध्ये यापूर्वी 31 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेनुसार, 21.8 किलोमीटर लांबीच्या अटल सेतूवरून जाणाऱ्या सर्व वाहनांवर टोल आकारला जात होता. परंतु, आता इलेक्ट्रिक वाहनांना सूट मिळाल्याने प्रवाशांचा खर्च कमी होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने 2021 मध्ये जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार, ईव्ही वापरकर्त्यांना विविध प्रकारचे फायदे देण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यांवरील कर सवलत, खरेदी अनुदान, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि आता प्रमुख महामार्गांवरील टोल सूट यांचा समावेश आहे. ही सूट केवळ खाजगी इलेक्ट्रिक कार, राज्य परिवहनाच्या इलेक्ट्रिक बसेस आणि शहरी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बस/कार यांनाच लागू असेल. मात्र, इलेक्ट्रिक मालवाहतूक वाहनांना याचा लाभ मिळणार नाही.
हेही वाचा - Chhtrapati Sambhajinagar Crime : पोलिसांनीच काढली आरोपीची धिंड ; मद्यपानासाठी पैसे न दिल्याने केला होता हल्ला, जाणून घ्या नेमकं काय झालं?
इतर एक्सप्रेसवेजवरही सवलत -
प्राप्त माहितीनुसार, लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी एक्सप्रेसवे वरदेखील अशाच प्रकारे इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्त प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ वाहतूक उपायांना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे.
हेही वाचा - Pune Crime: पिंपरी चिंचवडमध्ये मास्कमॅनची दहशत, भरदिवसा हातात चाकू आणि...
मुंबईत 22,400 ईव्ही नोंदणीकृत -
सध्या मुंबईत एकूण 22,400 इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत आहेत. यामध्ये 18,400 हलकी चारचाकी, 2500 हलकी प्रवासी वाहने, 1200 जड प्रवासी वाहने आणि 300 मध्यम प्रवासी वाहने आहेत. अटल सेतूवर दररोज तब्बल 60 हजार वाहने धावतात, त्यापैकी 34 हजार ते 40 हजार वाहने केवळ अटल सेतूचा वापर करतात. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत आणि आसपासच्या भागात ईव्हींचा वापर आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.