रविवारी, 30 मार्च 2025 रोजी, राज्यभरात गुढीपाडवा साजरा होणार आहे. गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन होणार आहे. त्यापैकीच एक म्हणजे, मुंबईतील प्रसिद्ध गिरगावचा गुढी पाडवा उत्सव. या ठिकाणी, मोठ्या संख्येमध्ये ढोल - ताशांचा गजर, लेझीम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी होतात. ही शोभायात्रा खास असण्यामागे अनेक कारण आहेत. चला तर जाणून घेऊया.
गिरगावातील 'या' ठिकाणी होणार प्रसिद्ध शोभायात्रा:
गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची हिंदू नववर्ष स्वागतयात्रा म्हणजेच 'गिरगावचा पाडवा'. यावर्षी, 'मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात' या संकल्पनेवर आधारित आहे. यावर्षी, गुढी पाडवा रविवारी, 30 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता गिरगावमधील फडके श्री गणपती मंदिरापासून स्वागतयात्रेला सुरुवात होणार आहे. यंदा, या स्वागतयात्रेचे 23 वे वर्ष आहे. 'शोभा यात्रा' किंवा 'नववर्ष स्वागत यात्रा' ही शहरातील गुढीपाडव्याच्या उत्सवातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
बुलेटवर स्वार होतात महिलावर्ग:
दरवर्षीप्रमाणे, यंदाही या स्वागतयात्रेत पारंपरिक नऊवारी साडी, नाकात नथ, डोळ्यावर ब्रँडेड गॉगल, डोक्यावर रंगीबेरंगी फेटे, आणि बुलेटस्वार महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, पारंपरिक रांगोळ्या, गिरगाव कलामंचतर्फे संस्कारभारती रांगोळ्या, तसेच रंगशारदातर्फे स्वागतयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या आणि शेवटी यात्रेदरम्यानचा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही या स्वागतयात्रेची मुख्य वैशिष्ट्ये असणार आहेत.
विदेशी पर्यटकांची पसंती:
गिरगावमध्ये होणाऱ्या प्रसिद्ध शोभायात्रा पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. पारंपारिक कपडे घातलेले रंगीबेरंगी, आनंदी आणि सुंदर तरुण विदेशी पर्यटकांना खूप आकर्षित करतात. त्यासोबतच, त्यांना भारतीय सण, परंपरा आणि संस्कृती पाहण्यासाठीदेखील या ठिकाणी येतात.
मराठी संस्कृती टिकवण्यासाठी:
राजकीयदृष्ट्या आणि त्यासोबतच, मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी 1999 साली मुंबईतील मराठमोळ्या भागात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेची सुरुवात झाली. याची सुरुवात डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले होते. या संस्थानचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी ही संकल्पना मांडली होती. खरंतर, गुढी पाडवानिमित्त शोभायात्रेची सुरुवात डोंबिवलीपासून झाली. त्यानंतर, गिरगाव, दादर, परळ ठिकाणातून मराठमोळ्या बांधवानी डोंबिवलीमध्ये स्थलांतर केल्यामुळे शोभायात्रेची सुरुवात डोंबिवलीपासून झाली. मात्र, हळूहळू या शोभायात्रेची सुरूवात गिरगाव, दादर, परळ या ठिकाणीदेखील होऊ लागली.