मुंबई: दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या मेळाव्याचे वेगळे महत्त्व आहे, कारण मनसेने आधीच जोरदार बॅनरबाजी करत वातावरण तापवले आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून गाजलेल्या विधानसभेतील चर्चेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अवमानावर राज ठाकरे काय भूमिका घेणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर लावून विरोधकांना टोले लगावले आहेत. ‘मराठी माणसाचा आवाज’ पुन्हा बुलंद होणार का? मनसे भविष्यात निवडणूक रणनिती कशी आखणार? हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक उत्सुक आहेत.गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या या मेळाव्यात मनसे आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संकेत देणार का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.