मुंबई: आज गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहेत. मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी जवळपास 22 वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. जवळपास दोन तास ते कुटुंबियांसह शिवतीर्थावर होते. शिवतीर्थावर ठाकरे बंधूंच्या भेटीत काय झालं?, याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या बाप्पाचे मनापासून दर्शन घेतले. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही बाप्पाचे दर्शन घेतले.
हेही वाचा: Uddhav Thackeray Arrive at Raj Thackeray’s Residence: उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन, पहा व्हिडिओ
उद्धव आणि राज भेटीत काय झालं?
22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. राज ठाकरे शिवतीर्थवर आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. पहिल्यांदाच उद्धव सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले होते. यादरम्यान दोन तास ठाकरे बंधू एकत्र असल्याची माहिती आहे.
ठाकरे बंधूंच्या भेटीबद्दल काय म्हणाले महेश सावंत?
आज आनंदाचा दिवस आहे. खेळीमेळीचे वातावरण होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पांचे दर्शन घेतले. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. खूप वर्षांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट झाली असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र यावे अशी मराठी माणसांची आणि सगळ्यांचीच इच्छा आहे. मनसैनिक व शिवसैनिक भाऊ भाऊ असल्याचे त्यांनी म्हटले. ठाकरे कुटुंब एकत्रितपणे दुसऱ्या मजल्यावर होते. त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबाचे स्नेहभोजन झाले असल्याची माहिती सावंत यांनी दिली. तर, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे गणपती असलेल्या मजल्यावर होते अशी माहिती सावंत यांनी दिली.
दोघांमध्ये 10 मिनिटे चर्चा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला. दोन्ही भावांमध्ये 10 मिनिटे स्वतंत्र चर्चा झाली. या चर्चेवेळी दोन्ही नेत्यांशिवाय आजूबाजूला इतर कोणीही नव्हते. त्यामुळे आता या 10 मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय झालं, या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.