Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय असून गेल्या एका आठवड्यापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने 7 सप्टेंबरसाठी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. IMD च्या अंदाजानुसार, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघरसह कोकणात अलर्ट -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसह काही जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु पुण्यातील घाट भागात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये हलका पाऊस पडेल. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची शक्यता असून यलो इशारा जारी करण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनानंतर जुहू बीचवर अमृता फडणवीस व अक्षय कुमार स्वच्छता मोहिमेत सहभागी
उत्तर महाराष्ट्रातील हवामान अंदाज -
याशिवाय, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबारसाठी मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे.
हेही वाचा - Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनादरम्यान पुणे जिल्ह्यात 4 जण बुडाले; दोघांचा शोध सुरू
विदर्भाताील हवामान अंदाज -
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच हवामान विभागाने या जिल्ह्यांमद्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तथापी, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी वादळी वाऱ्याचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे.