मुंबई: संपूर्ण मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुकांचे वातावरण आहे, त्याचवेळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालय आणि सहार विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आली आहे.
विसर्जन मिरवणुकीत गर्दी, त्यातच धमकीचा मेल
मुंबईत सध्या गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी लाखो भाविकांची गर्दी आहे. तब्बल 22 तासांच्या प्रवासानंतर बाप्पा चौपाटीवर पोहोचले आहेत. भरतीच्या लाटांमुळे विसर्जनाची प्रक्रिया उशिरा सुरू होत असतानाच धमकीच्या मेलमुळे वातावरण आणखी गंभीर झालं आहे. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलीस आणि सुरक्षा दलांनी चौपाटी परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा: Ganesh Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर; अखेर समोर आलं खरं कारण
नायर रुग्णालयाला धमकी
संदेशानुसार, नायर रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले आहे. हा मेल कोणी आणि कुठून केला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, पोलिसांनी तातडीने रुग्णालय परिसर तपासून पाहणी केली. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण आणि नातेवाईक असल्यामुळे प्रशासनाने तणावाखाली जलदगतीने कारवाई केली आहे.
विमानतळालाही धोका
फक्त नायर रुग्णालयच नव्हे तर सहार विमानतळालादेखील धमकी देण्यात आली आहे. मेलमध्ये विमानतळाच्या शौचालयात बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळ सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. प्रवाशांची तपासणी अधिक कडक करण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा:Weather Update: आज मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पालघरसह 9 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
याआधीही मिळाल्या धमक्या
ही पहिली वेळ नाही की मुंबईला अशा प्रकारची धमकी आली आहे. काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून एक संदेश पाठवण्यात आला होता. त्यात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला गेला होता. तसेच अनंत चतुर्दशीपूर्वी मोठा स्फोट होईल असेही त्या संदेशात नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केल्यानंतर आता पुन्हा नवीन मेलमुळे खळबळ माजली आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
मुंबई पोलिस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब स्क्वॉडने तातडीने तपास सुरू केला आहे. नायर रुग्णालय आणि विमानतळ परिसराची काटेकोर झडती घेतली जात आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, भाविकांच्या प्रचंड गर्दीत अशा धमकीमुळे घबराट निर्माण झाली आहे.
मुंबईसारख्या शहरात सणाच्या उत्साहात अशा प्रकारची घटना घडणे ही चिंतेची बाब आहे. एकीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जनाची वाट पाहणारे भक्त नाचत-गात निरोप देत आहेत, तर दुसरीकडे शहराच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.