मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडझाप सुरू असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काळात राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील 24 महत्त्वाचे असल्याचे हवामान विभागानं नमूद केलं आहे. शिवाय, 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान, राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Maharashtra Police Bharti 2025: सरकारची मोठी घोषणा! पोलीस विभागात 15,000 जागांसाठी मेगा भरती जाहीर
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला तसेच कोल्हापूरच्या घाट भागाला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या सर्व सात जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.