छत्रपती संभाजीनगर : गावरान लसणाच्या झणझणीत फोडणीशिवाय वरण-भाताचा स्वाद अपूर्ण वाटतो हवा तसा खमंगपणा येत नाही. साधं वरण असो किंवा कोणती भाजी सगळ्यामध्ये फोडणी देणे हे गरजेचं ते पण लसणाचा वापर करून. मात्र, सध्या किचनमध्ये फोडणीसाठी लसूण वापरण्याआधी गृहिणी दहा वेळा विचार करू लागल्या आहेत. कारण गावरान लसणाचे दर किलोमागे तब्बल ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. दोन वर्षांपूर्वी फक्त ४० रुपये किलो मिळणारा लसूण आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
लसूण ही रोजच्या आहारातील महत्त्वाची गोष्ट असली, तरी तिच्या किमतींनी ग्राहकांना तडजोड करण्यास भाग पाडले आहे. गृहिणींना लसणाच्या झणझणीत फोडणीला पर्याय शोधावा लागत आहे. मात्र, लसूण विक्रीतून शेतकऱ्यांच्या खिशात किती पैसे जातात, हा एक गंभीर प्रश्न आहे. बाजारातील वाढीव दरांचा फायदा मोठ्या व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे.
लसणाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही उत्पादन खर्च, हवामान बदल, आणि साठेबाजीसारख्या समस्यांशी जोडलेली आहे. शेतकरी मेहनतीने गावरान लसूण उत्पादित करतात, मात्र त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. दुसरीकडे, ग्राहकांना या वाढीव दराचा फटका बसतो.सध्याच्या परिस्थितीत ग्राहक लसणाशिवाय पर्यायांचा विचार करत आहेत, तर शेतकरी त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा, यासाठी संघर्ष करत आहेत.