मुंबई: 'कधी औषधे नाहीत, कधी डॉक्टर नाहीत तर कधी अँब्युलन्सच नाही.' अशा विविध कारणांमुळे सतत नकारात्मक चर्चेत असलेल्या कल्याण येथील केडीएमसीच्या रुख्मिणीबाई रुग्णालयावर केडीएमसी आयुक्तांनी बुधवारी सामान्य नागरिक बनून अचानक भेट दिली. यावेळी, उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णासोबतचा सहकारी बनून त्यांनी रुग्णालयात केसपेपर काढण्यापासून ते ओपीडी आणि फार्मसी अशा प्रमुख विभागांची पाहणी करून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या तक्रारींचा आलेख वाढतच चालला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी महिलेच्या झालेल्या मृत्यूनंतर या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापासून ते सगळीकडून टीकेचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी अचानकपणे दिलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा: पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कोणती अचूक शस्त्रे वापरली? जाणून घ्या
या भेटीमध्ये आपण रुग्णालयातील सर्व प्रमुख विभागांना भेट दिली आणि सर्व गोष्टी तपासून घेतल्या', अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली. यासोबतच, रुग्णालयाच्या कार्यपद्धतीमध्ये काय सुधारणा करणे आवश्यक आहे यावर चर्चा केली. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत आयुक्त अभिनव गोयल रुक्मिणीबाई रुग्णालयात ठामपणे होते.
या भेटीनंतर आयुक्तांनी दिलेले निर्देश:
1 - रुग्णांना शक्य तितक्या लवकर उपचार मिळाले पाहिजेत, ज्यामध्ये ओपीडीमध्ये डॉक्टरांची त्वरित उपलब्धता समाविष्ट आहे.
2 - ऑपरेशनसाठी आपण कोणत्या गोष्टी वाढवू शकतो याबद्दल चर्चा करणे.
3 - डॉक्टर आणि नर्सेस यांच्या राऊंड-द-क्लॉक ड्युटीबद्दल पाहणी करून सूचना देणे.
4 - विशेषतः डॉक्टरांनी अनावश्यकपणे रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्याचा सल्ला देऊ नये. याची खबरदारी डॉक्टरांनी घेणे आवश्यक आहे.
5 - मात्र, गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे जलद आणि वेळेवर रेफर करावे.
यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी दिपा शुक्ला यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून, त्यांना यासाठी एक सिस्टम तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच ही सिस्टम योग्य पद्धतीने चालते की नाही याची दररोज पाहणी करून रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देखील आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले.