बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत असेलला सतीश ऊर्फ खोक्या भोसले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बीड पोलिसांनी प्रयागराज येथे त्याचा ताबा घेतला होता. मात्र,त्याला आज महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला खोक्याला विमानाने आणण्यात आलं. संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला बीडकडे घेऊन जात आहे. पुढील तासाभरात खोक्याला बीडला नेण्यात येईल.
खोक्याचे आणखी काही प्रताप
वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून वनविभागाने सतीश भोसलेच्या घरावर छापा टाकला असता, धारदार शस्त्रं, जाळी, वाघूर आणि प्राण्यांचे अवशेष पोलिसांना आढळून आले. यावरून शेकडो हरणे, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हरणाच्या पार्ट्यांचे अवशेष देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील बावी गावाच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचा कळप आढळतो. मात्र, खोक्या भोसले आणि त्याच्या टोळीने या कळपाला लक्ष्य केले. ढाकणे यांच्या शिवारातील डोंगरामध्ये हरणांना अन्न व पाणी शोधण्यासाठी येणाऱ्या ठिकाणी जाळी लावून त्यांची शिकार केली जात असल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आले आहे.