कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी, जिचे गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते आहे, तिला 29 जुलै रोजी गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले. त्यामुळे, हत्तीणीशी भावनिक नाते जोडलेल्या नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीय नागरिकांनी आपल्या साश्रूपूर्ण डोळ्यांनी निरोप दिला. अशातच, वनताराने माधुरी हत्तीणीच्या स्वागताचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केले होते. हा फोटो पाहताच, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासह, वनतारा आणि पेटावरही नागरिक आक्रमक आहेत. फोटोमध्ये, माधुरीच्या पायाला काहीतरी लागल्याचे दिसत आहे, असा दावा नेटकरी करत आहेत.
वनताराने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे, या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत माधुरीला पहिल्याच दिवशी तिच्या पायाला दुखापत झाली. यासह, तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. विशेषत: 'या फोटोत जी व्यक्ती दिसत आहे, ती व्यक्ती माधुरीला चिमटीमध्ये पकडला आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया या पोस्टवर येत आहे.
एका व्यक्तीने कमेंट करत सवाल केला की, 'पेटा वाल्यांनो आता तुम्हाला दिसत नाही का? आमच्या माधुरीला त्या माणसाने कसं हाताच्या चिमटीने पकडलं आहे. हीच काळजी आहे की त्या वनताराची?'. यासह, इतर नेटकऱ्यांनी कमेंट केले की, 'माधुरीच्या पायाला काय झालं? खूप वाईट झाले आहे, ती जिथे होती तिला तिथेच ठेवायला पाहिजे होते'. 'तो एक फोटो सोडला तर बाकी फोटो किंवा व्हिडिओमध्ये माधुरीचा तो पाय लपवला आहे', असा दावाही नेटकऱ्यांनी केला आहे.
यासह, माधुरी हत्तीला वनतारामधून नंदणीत पुन्हा आणण्यासाठी पहाटे 5 वाजता नांदणी निशिधिका येथून मूक पदयात्रेची सुरुवात झाली आहे. या मूक पदयात्रेत सर्व जाती आणि धर्माचे लोक सहभागी झाले आहेत. या दरम्यान, गर्दीचा महापूर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: 'कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या';अजित दादांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
नेमकं प्रकरण काय?
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला. या प्रकरणी, 'पेटा' न्यायिक पातळीवर पोहोचले. यानंतर, चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. यासह, समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. या दरम्यान, नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबतची याचिका नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे, नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण वनताराकडे जाणार असे निश्चित झाले. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे, नांदणीचे ग्रामस्थ मात्र नाराज झाले. नांदणीतील मठ जैन धर्मियांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. गेल्या 30 हून अधिक वर्षांपासून माधुरी उर्फ महादेवी हत्तीण याठिकाणी लहानाची मोठी झाली. मात्र, याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा येथे नेण्यात आले. उच्च न्यायालयाने हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथे पाठविण्याचा आदेश दिल्यानंतर, नंदणीच्या ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्यांना निराशा मिळाली.