कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला 29 जुलै रोजी गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले. यामुळे, कोल्हापुरकर आक्रमक असून माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली आहे.
31 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माहिती दिली होती की, 'येत्या रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा काढली जाईल'. यासह, राजू शेट्टींनी सर्वांना आवाहन केले की, 'आत्मक्लेष पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे, सर्वपक्षीय नेत्यांनी आणि माधुरी उर्फ महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी या आत्मक्लेष पदयात्रेत सहभागी व्हावे'.
हेही वाचा: Madhuri Elephant : महादेवी हत्तीण 'वनतारा'त दाखल; पहिला फोटो पाहून नेटकरी आक्रमक
महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी 'स्वाक्षरी मोहीम'
गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गावकऱ्यांपासून हिरावून घेतल्याने गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. यासह, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली होती. माहितीनुसार, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सव्वा दोन लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: मैत्री दिनाच्या दिवशी मित्राने केला घात; मित्राच्या डोक्यावर केला चाकूने वार
वनतारा प्रशासन काय म्हणाले?
'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत', अशी प्रतिक्रिया वनताराच्या प्रशासनाने दिली. वनताराचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 'कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत केले जाईल'.