Sunday, August 31, 2025 08:48:52 PM

आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात – 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

ड्रोन कॅमेरांची नजर; कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा – 271 भरारी पथकं सज्ज

आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात – 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई :  महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा आजपासून (मंगळवार, 11 फेब्रुवारी) सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परिक्षेला सामोरे जाणार आहेत. विशेषत: मुंबई विभागातून 342012 विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यापैकी नियमित विद्यार्थ्यांची संख्या 325571 आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी 271 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचारी, तसेच विशेष महिला भरारी पथकाचा समावेश आहे.

👉👉 हे देखील वाचा : लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती देण्याची मागणी

वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे 166429 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून, विज्ञान शाखेतून 127704 आणि कला शाखेतून 47879 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.


वडिलांच्या आठवणींना गाठीशी बांधून वैभवी देशमुख आज देणार बारावीची परीक्षा

मयत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत आज बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. परीक्षेला निघण्यापूर्वी तिने वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि त्यांच्या आशिर्वादाने इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी रवाना झाली. अहिल्यानगर, जामखेडजवळील पाडळी गावात तिची परीक्षा होत असून, वडिलांच्या आठवणींना गाठीशी बांधून ती आत्मविश्वासाने परीक्षा देत आहे.

अमरावती विभागात कडक उपाययोजना
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील 152982 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसाठी एकूण 542 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

गैरप्रकार रोखण्यासाठी 9 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, शिक्षण अधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक कार्यरत असेल. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रामाणिकपणे द्यावी आणि गैरप्रकार टाळावेत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.


सम्बन्धित सामग्री