मुंबई : महाराष्ट्र राज्याने दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. सन 2024-25 या वर्षात सर्वाधिक 537 बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक इच्छुक पालकांना सोपविण्यात आले. यामुळे बालकांना हक्काचे ‘पालक’ व ‘घर’ मिळाले आहे, अशी समाधानाची भावना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
देशात एकूण कायदेशीर दत्तक मुक्त बालकांची संख्या 4512 इतकी असून यापैकी महाराष्ट्रात एकूण 537 बालके कायदेशीर दत्तक मुक्त करण्यात आली आहे. या दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचे आई-वडील व कुटुंब मिळवून देण्यात आली आहेत. सातत्याने काम करुन दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वलस्थानी आणल्याबद्दल या उल्लेखनीय यशासाठी महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, संस्था व राज्याच्या दत्तक स्त्रोत संस्थांचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा : मंत्रिमंडळ निर्णय
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, सुधारीत अधिनियम 2021 आणि कारा दत्तक नियमावली 2022 च्या अनुषंगाने राज्यात प्रभावीपणे दत्तक प्रक्रिया राबवण्यात आली आहे. केंद्रीय दत्तक स्त्रोत संस्था (कारा), नवी दिल्ली यांनी या उल्लेखनीय कामाची दखल घेतली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत 60 विशेष दत्तक मान्यता प्राप्त संस्था कार्यरत असून या संस्थांच्या माध्यमातून दत्तक पात्र बालकांना कायदेशीर मुक्त घोषित करून त्यांना हक्काचे पालक व कुटुंब मिळवून देण्याचे कार्य केले जाते.
महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आणि आयुक्त नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. अनेक बालकांना सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंब मिळावे यासाठी दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.