जळगाव: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था हे नवे चित्र उरलेले नाही. ममुराबाद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची स्थिती तर अधिकच गंभीर झाली आहे. ही शाळा सध्या शिक्षणाचं मंदिर न राहता दारूच्या अड्ड्यात रूपांतरित झाली आहे. शाळेच्या आवारात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या दिसून येतात.
या शाळेत शिपाई नसल्याने स्वच्छतेचे कोणतेही नियोजन नसून, विद्यार्थ्यांनाच शौचालये आणि वर्ग साफ करावी लागतात. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही सुविधा नाही. गावात सकाळी साडेपाच वाजता पाणी येतं, परंतु शाळेत कोणीही ते पाणी भरण्यासाठी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागते.
हेही वाचा: महापालिका प्रशासनाच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे अन्नत्याग आंदोलन
शाळेतील स्वच्छता गृहातही पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर जायची वेळ येते. या संपूर्ण स्थितीवर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, शाळेत ना मुख्याध्यापक आहेत, ना शिपाई. यामुळे मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे.
हेही वाचा: गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? राऊतांचा सवाल
शाळेच्या आवारात साचलेला कचरा, घाण, आणि दारूच्या बाटल्या पाहून हे शिक्षणाचे केंद्र नव्हे तर दुर्लक्षित ठिकाण वाटते. शासनाने त्वरित लक्ष घालून विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.