Monday, September 01, 2025 08:29:31 AM

मनसे गुढीपाडवा मेळ्यासाठी जय्यत तयारी; जाणून घ्या कशी असेल संपूर्ण व्यवस्था

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.

मनसे गुढीपाडवा मेळ्यासाठी जय्यत तयारी जाणून घ्या कशी असेल संपूर्ण व्यवस्था

मुंबई: दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, त्यांच्या संभाव्य घोषणांबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

यंदाचा मेळावा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे, कारण औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अवमानासंदर्भात राज ठाकरे काय बोलणार व नेमक्या कोणत्या भूमिका घेणार, याकडे याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेने मेळाव्यासाठी भव्य आयोजन केले आहे. 

वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था

मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांची सोय लक्षात घेऊन वाहतूक आणि पार्किंगसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे:
    •    पश्चिम उपनगरातून येणाऱ्या वाहनांसाठी - रेतीबंदर (ड्रॉप पॉइंट: शोभा हॉटेल)
    •    पूर्व उपनगर आणि पुणे येथून येणाऱ्यांसाठी - पाच गार्डन (ड्रॉप पॉइंट: कोतवाल गार्डन)
    •    कुलाबा भागातून येणाऱ्या वाहनांसाठी - रचना संसद कॉलेज लेन (ड्रॉप पॉइंट: सिद्धिविनायक मंदिर)
    •    भायखळ्याहून येणाऱ्यांसाठी - कामगार क्रीडा केंद्र येथे पार्किंग
    •    व्हीआयपी वाहनांसाठी - स्वा. सावरकर स्मारक, बिमासि क्रीडा भवन, वनिता समाज हॉल, गांधी स्विमिंग पूल येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

मेळाव्यासाठी करण्यात आलेली तयारी

मनसेच्या या मेळाव्यासाठी विशेष तयारी करण्यात आली असून, मैदानावर प्रचंड संख्येने मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सोयी-सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे:
    •    भव्य स्टेज - 66 फूट रुंद आणि 40 फूट लांब व्यासपीठ उभारले गेले आहे.
    •    मोठ्या एलईडी स्क्रीन - 4 मोठ्या स्क्रीनद्वारे उपस्थितांना स्पष्ट दृश्य मिळेल.
    •    पिण्याच्या पाण्याची व्यवस्था - मैदानात पाण्याचे टँकर्स आणि बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत.
    •    स्वच्छतागृहांची व्यवस्था - फिरती शौचालये उपलब्ध असतील.
    •    आरोग्य सुविधा - प्रत्येक गेटवर अँब्युलन्स ठेवण्यात आली आहे, तसेच सुश्रुषा आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन खाटांचे आरक्षण करण्यात आले आहे.
    •    अग्निसुरक्षा व्यवस्था - मैदानाजवळ फायर ब्रिगेडचे फायर इंजिन तैनात करण्यात आले आहे.

मेळाव्यासाठी प्रवेशद्वार

मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असल्यामुळे प्रवेशासाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे:
    •    विशेष निमंत्रित आणि पदाधिकारी - कालिका माता मंदिर गेट
    •    पत्रकार आणि व्हीआयपी - स्वामी समर्थ मंदिर गेट

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून, या मेळाव्यात राज ठाकरे कोणते मुद्दे उपस्थित करणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 


सम्बन्धित सामग्री