Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले असून, नागपूर विमानतळावर सकाळी 8;30 वाजता त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीस्थळाला भेट देत आहेत. संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ते नागपुरात आले. रेशीमबाग येथील संघ स्मृती मंदिरात त्यांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिव गोलवलकर यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा: मोदींच्या नागपूर दौऱ्याची जय्य्त तयारी! असं असेल संपूर्ण नियोजन
दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन
नागपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी सकाळी 9;30 वाजता दीक्षाभूमीवर दाखल झाले. या ऐतिहासिक स्थळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केले. सामाजिक समरसतेचे प्रतीक असलेल्या या ठिकाणी पंतप्रधानांनी नतमस्तक होत बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला.
संघ मुख्यालयाला ऐतिहासिक भेट
पंतप्रधान मोदींनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत संघ संस्थापकांना वंदन केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या संवैधानिक पदांवर कार्यरत असताना त्यांनी संघाच्या मुख्यालयाला दिलेली ही पहिलीच भेट ठरली आहे.