MNS workers take action Gujarati signboards
Edited Image
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे आणि हॉटेल्सवर लावण्यात आलेले गुजराती भाषेचे फलक हटवण्यात आले आहेत. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, 'सर्व फलक मराठीतचं हवेत, अन्यथा पुढेही कारवाया सुरूच राहतील.'
स्थानिकांचा पाठिंबा -
या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले. त्यांनी दुकानदारांना स्पष्ट सांगितले की, गुजराती फलक जर हटवले नाहीत तर त्यांचे परिणाम भोगावे लागतील. या कारवाईला स्थानिक मराठी जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला.
हेही वाचा - मराठी नाही बोलली तर भोकं पडणार का?, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान चर्चेत
मनसेचा भाषिक वादांमधील हस्तक्षेप हा नवीन नाही. याआधी हिंदी भाषिकांवर हल्ले, साइनबोर्ड काढणे, आदी कृतींसाठी हा पक्ष ओळखला जातो. मराठी संस्कृती आणि भाषेचे रक्षण करण्याच्या नावाखाली मनसेचे कार्यकर्ते अनेकदा आक्रमक भूमिका घेताना दिसतात.
हेही वाचा - व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मराठी वापरल्याने नवी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्यावर 4 मित्रांचा हल्ला
राजकीय स्टंट की संस्कृती रक्षण?
मनसेकडून मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा चर्चेत राहण्यासाठी अशा कृती केल्या जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला फारशी यशस्वी कामगिरी करता आलेली नाही, आणि त्यामुळे अशा भाषावादावर आधारित हालचाली राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न असू शकतात, असेही अनेक तज्ञांचे मत आहे.