नाशिक: नाशिकच्या गोविंद नगर परिसरातील सदाशिव नगर जॉगिंग ट्रॅकजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एक शिक्षिका ठार झाली असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. गायत्री संदीप ठाकूर आणि मिलन जाचक या दोघी शिक्षिका गंगापूर रोड येथील एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. विवाह सोहळा आटोपून त्या दोघी घरी परतत असताना जॉगिंग ट्रॅकजवळील ज्यूस स्टॉलवर थांबल्या. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात गायत्री संदीप ठाकूर गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ठाकूर यांच्या पश्चात पती आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी सहावीत तर दुसरी मुलगी दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यांच्या पतींची नोकरी एलआयसीमध्ये आहे.
मृत शिक्षिका गायत्री ठाकूर या उंटवाडी परिसरातील त्रिमूर्ती चौकाजवळील माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. इंदिरानगर परिसरात त्या आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे विद्यार्थी, सहकारी आणि स्थानिक नागरिक यांनी या घटनेमुळे दु:ख व्यक्त केले आहे.
भरधाव वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.