मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलांमध्ये विविध समीकरणं होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे की नाही, यावर शंका उपस्थित होत असतानाच दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादीदेखील आपली रणनिती आखत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वतयारीला सुरूवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटातून आतापर्यंत बाहेर असलेले नवाब मलिक यांना पुन्हा एंट्री देण्यात आली असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांकडे अजित पवार यांनी मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी नवाब मलिक यांना अधिकृत पत्रक दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा Karuna Sharma : 'बंगला सोडा, माझ्या घरी राहायला या'; करुणा शर्मांची धनंजय मुंडेंना ऑफर
नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची टीम तयार करण्यात आली असून यामध्ये मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर-मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.