Thursday, August 21, 2025 04:53:53 AM

स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपीला अटक; 'गळ्यावर दोरीचे वळ, आत्महत्येचा प्रयत्न?' पोलिसांची माहिती

Pune Bus Rape Case : या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरण आरोपीला अटक गळ्यावर दोरीचे वळ आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांची माहिती

पुणे : शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याची माहिती आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली. 'प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत, यावरून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे वाटते,' असे पुणे पोलीस आयुक्त म्हणाले.

हेही वाचा - बंद पडलेल्या शिवशाही बसेसमध्ये कंडोमची पाकिटं

खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असं आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला, असे तो म्हणाला. त्याने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याची चौकशी करण्याकरता पथक तिथे पाठवण्यात येणार आहे. परंतु प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते,' असं आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

वेगवेगळ्या प्रतिक्रिया 
आरोपीला अटक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून रात्री 1:30 वा.पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सलग 3 दिवस आरोपीचा जलद गतीने शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांच्या १३ पथकांसह संयुक्त कारवाईत शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते. याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतच आहे. पण असे गुन्हे घडूच नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्‍न करत असतो”,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की,'एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशी मांडावी हा त्यांचा अधिकार आहे. काल पुण्यातील घटनेचा सगळ्यांनीच निषेध केला आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्या नराधमाला ताबडतोब अटक व्हायला हवी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. काल मध्यरात्रीनंतर त्याला अटक केली आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. सविस्तर चौकशी चालू आहे. याविषयी माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे.'

हेही वाचा - Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती

पोलिसांचं खबऱ्यांचं जाळं कमकुवत
दरम्यान, काही निवृत्त अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, 'आरोपी सापडायला फार वेळ लागला. पूर्वी आतासारखी अत्याधुनिक साधने नव्हती. मात्र, पोलिसांचं खबऱ्यांचं जाळं मजबूत होतं. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पुणेकर यांचे संबंध पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. ‘फील्ड वर्क’पेक्षा कार्यालयात बसून आरोपींचा शोध घेण्याची कार्यपद्धतीही गुन्हेगारी वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. एके काळी घटना घडताच आरोपीला बेड्या घालणारे पोलीस म्हणून पुणे पोलिसांची ख्याती होती. काही वेळा गुन्हा घडण्याच्या आधीही पोलिसांना सुगावा लागत असे. त्यामुळे अनेक गुन्हे घडण्याच्या आधीच थांबवले जात होते. सार्वजनिक उत्सव आणि लोकांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संपर्कात दरी पडल्याने पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचे निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
 


सम्बन्धित सामग्री