Sunday, August 31, 2025 08:40:08 AM

Dry Days in Pune: पुण्यात गणेशोत्सव काळात दारू विक्रीवर बंदी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत दारू विक्री, खरेदी आणि सेवन करण्यावर पूर्ण बंदी राहणार आहे.

dry days in pune पुण्यात गणेशोत्सव काळात दारू विक्रीवर बंदी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Dry Days in Pune: आगामी गणेशोत्सव उत्सवात शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत दारू विक्री, खरेदी आणि सेवन करण्यावर पूर्ण बंदी राहणार आहे. म्हणजेच, या 10 दिवसांत पुणेकरांसाठी ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला आहे.

हा आदेश मुख्यत्वे पुणे महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत लागू राहील. विशेषत: विश्रामबाग आणि फरासखाना या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारूची दुकाने 10 दिवस पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पाचव्या व सातव्या दिवशी विसर्जन मार्गांवरील दारूची दुकाने बंद ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यामागे विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येऊ नये, तसेच सार्वजनिक सुरक्षा व शिस्त अबाधित राहावी, हा प्रशासनाचा उद्देश आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2025 : डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल चार दिवस राहणार बंद; विसर्जनादरम्यान वाहतुकीतही बदल

गेल्या वर्षी उत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच दारूबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या वर्षी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना औपचारिक पत्र पाठवून संपूर्ण उत्सव कालावधीत बंदी लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यंदा संपूर्ण 10 दिवस दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन, AI आणि विशेष दलांसह कडक बंदोबस्त; 18 हजार पोलिस तैनात

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी घट्ट जोडलेला उत्सव असल्याने लाखो भाविक शहरात गर्दी करतात. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिस आणि प्रशासन दोन्ही यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. प्रशासनाचा हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री