Sunday, August 31, 2025 06:09:39 AM

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ही’ मागणी मान्य; देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

उज्जवल निकम यांच्या नियुक्तीसाठी  प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ही’ मागणी मान्य देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

Beed Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता. त्यानुसार, राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक मागणी मान्य केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात वृत्त दिलं.

'बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता जलद वेगाने तपासणी होणार असून आरोपपत्र दाखल करतानाही याचा फायदा होऊ शकणार आहे. उज्जवल निकम यांच्या नियुक्तीसाठी  प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे. उज्ज्वल निकम यांनी 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे खटले यशस्वीरीत्या लढवले आहेत.

हेही वाचा - आम्हाला कोणतेही शिष्टमंडळ येऊन भेटलं नाही- देशमुख

मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आरोग्य पथकाकडून धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेलं नाही. धनंजय देशमुख यांचा रक्तदाब सामान्य असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली.

नवनीत कावत यांचा निरोप काय?
केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे धनंजय देशमुख यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत. मागण्या मान्य होत आहेत आंदोलन स्थगित करा हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निरोप वैभव पाटलांनी धनंजय देशमुख यांना दिला.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असतील तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपोयग होणार आहे”, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली.

वडिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं
'आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे. आम्हाला न्याय मिळण्यासाठी जे करणं शक्य आहे, ते मी करणार आहे. कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर, आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं,' अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या मुलगी वैभवी देशमुख हिने दिली.

मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या 7 प्रमुख मागण्या काय ?
1) केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.

2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा.

3) याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.

4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.

5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.

6) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून सहआरोपी करा.

7) घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करा.

हेही वाचा - Indrajeet Sawant: इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी

सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची कारकीर्द
सरकारी वकील म्हणून त्यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारची बाजू मांडली. या प्रकरणापासून त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. त्यानंतर 1997 साली टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार आणि 2006 साली भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातही उज्ज्वल निकम यांनीच सरकारची बाजू मांडली होती. निकम यांनी जळगाव जिल्ह्यातून वकिलीला सुरुवात केली होती.

2006 साली गाजलेल्या खैरलांजी प्रकरणातही निकम यांनी सरकारची बाजू लढविली होती. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यामध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांना गावात फिरवले गेल्याचाही आरोप होता. यानंतर शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, तसेच कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातही त्यांनी बाजू मांडली होती.

पण, मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांचे नाव घराघरांत पोहोचले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना उज्ज्वल निकम यांनी केलेली अनेक भाषणे गाजली. तसेच तुरुंगात अजमल कसाबकडून बिर्याणीची मागणी झाल्याचेही ते म्हणाले होते. पण, त्यानंतर त्यांनी हे विधान लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केले असल्याचे म्हटले.

उज्ज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीत 30 आरोपींना फाशीची शिक्षा आणि 600 हून अधिक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे ते अभिमानाने सांगतात. यापैकी फाशीच्या काही शिक्षांना वरच्या न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

काही खटल्यांमधून अर्ध्यातून माघार

मागच्या काही वर्षांत उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून मोठ्या केसेस हाती घेतल्या नव्हत्या. तर काही खटल्यांतून त्यांनी अर्ध्यातूनच माघार घेतली होती. 2011 साली मुंबईत झालेला तिहेरी बॉम्बस्फोट आणि 2014 साली पुण्यात मोहसीन शेख नामक तरुणाची झालेली हत्या, या प्रकरणाची सुनावणी त्यांनी अर्ध्यातूनच सोडली.

लोकसभा निवडणूक लढवली

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी 29 प्रकरणांतून काढता पाय घेतला होता. अनेक दहशतवादी प्रकरणांत त्यांनी आरोपीला शिक्षा मिळवून दिली असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उज्ज्वल निकम यांची देशभक्त अशी प्रतिमा दाखवली गेली. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा तब्बल 16,541 मतांनी पराभव झाला होता.


सम्बन्धित सामग्री