कोल्हापूर : प्रशांत कोरटकरच्या विरूद्ध शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी दिली होती. यामुळे मागील काही दिवसांपासून कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर होते. सोमवारी कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. दरम्यान कोल्हापूर पोलीस स्टेशनबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोल्हापूरातील जुना राजवाडा परिसरातील पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे. कोरटकरविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरटकरला सोमवारी तेलंगणातून अटक केल्यानंतर कोल्हापूर आणले. त्यामुळे पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवप्रेमींचा संताप झाला आहे. दरम्यान पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची सुरू आहे.
हेही वाचा : प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक
प्रशांत कोरटकर याने मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आणि तेलंगणात कोरटकरला अटक करण्यात आली. आता प्रशांत कोरटकर प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. इंद्रजीत सावंत, वकील असिम सरोदे देखील कोर्टात हजर आहेत. कोरटकरचे वकील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर आहेत. वकील सतीश घाग यांच्याकडून कोरटकरची बाजू मांडणं सुरू आहे. तर इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात वकील असीम सरोदे इंद्रजीत सावंत यांची बाजू मांडत आहेत. कोरटकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.
दरम्यान काँग्रेस ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कोरटकरच्या पापांवर पडदा टाकण्याचं काम वारंवार सुरू असल्याचे म्हटले आहे. कोरटकरला महाराष्ट्र द्रोही घोषित करा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. खोक्या, बोक्यांना महाराष्ट्र आपला वाटू लागला आहे. गुंडांना महाराष्ट्र सुरक्षित वाटू लागला असल्याची चिंता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
कोरटकरचा पोबारा ते अटक
मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रशांत कोरटकर याचा जामीन रद्द करण्यात आला. जामीन रद्द होताच त्याने चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणात पळ काढला. चंद्रपूर पोलिसांकडून याबाबत कोल्हापूर पोलिसांना खबर देण्यात आली. चंद्रपूरच्या सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये कोरटकर काही काळ मुक्कामी होता. कोरटकर ज्या गाडीतून पळाला त्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. चंद्रपूर पोलिसांनी गाडीचं सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांना पुरवलं. त्यानंतर चंद्रपूर-तेलंगणा सीमेवर लक्कडकोट टोलनाक्यावरील सीसीटीव्हीतूनही सुगावा लागला. चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये कोरटकर सट्टा व्यावसायिक धीरज चौधरीला भेटला होता. धीरज चौधरीच्या चौकशीतून कोरटकरबाबत महत्वाची माहिती हाती लागली. त्यामुळे कोरटकरचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना यश मिळाले.