वर्धा : वर्धा जिल्ह्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनामुळे 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मटकी आणि खिचडी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या, हगवण आणि तापाची लक्षणे दिसू लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 32 मुले आणि 5 मुली अशा एकूण 44 विद्यार्थ्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यापैकी सात विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर 37 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेच्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.