मुंबई: काँग्रेसचे माजी पालकमंत्री आणि मुंबई आमदार असलम शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पत्र लिहून 8 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
असलम शेख यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी मुस्लिम धर्मातील महत्त्वाचा सण ईद-ए-मिलादुन्नबी (रबी-उल-अव्वल 12) आणि शहरातील इतर मोठे सण एकाच वेळी येत आहेत. गणेश विसर्जन मिरवणुका व अनंत चतुर्दशीमुळे शहरात गर्दी आणि हलचाली वाढणार असल्याने सौहार्द, शांतता आणि सर्व धर्मांतील नागरिकांच्या भावना विचारात घेऊन मुस्लिम समाजाने स्वतःहून 8 सप्टेंबर रोजी मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Cabinet On OBC: ओबीसींच्या नाराजीमुळे सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळात...
असलम शेख म्हणाले,
'राज्यात इतर धर्मांच्या मोठ्या सणांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते. मग मुस्लिम समाजाच्या धार्मिक उत्सवाला का नाही? हा दिवस केवळ एका धर्माचा नव्हे, तर सामाजिक ऐक्याचा, शांततेचा आणि भाईचार्याचा संदेश देणारा आहे.'
धार्मिक व सामाजिक नेत्यांनीही या मागणीचे समर्थन करत राज्य सरकारकडे त्वरित निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी म्हटले की, सर्व नागरिकांचा विचार करून 8 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली पाहिजे, जेणेकरून हा उत्सव शांतता, सहिष्णुता आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा होऊ शकेल.
असलम शेख यांनी या मागणीमुळे राज्य सरकारकडे स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील सौहार्द आणि भाईचार्य टिकवण्यासाठी मुस्लिम धर्माचा हा महत्त्वाचा उत्सव सार्वजनिक सुट्टीत असावा.