विजय चिडे , प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यानंतर नांदर - दावरवाडी येथील सुर्यतेज अर्बन पैठण मल्टिपल पतसंस्थेने अनेक ग्राहकांच्या ठेवी गिळंकृत करून पोबारा केल्याने पैठण न्यायालयाच्या आदेशावरून संबंधित पतसंस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात अफरातफर व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
वर्षभरापूर्वी पाथरवाला (ता.गेवराई जि.बीड) येथील ज्ञानेश्वर नारायण जाधव (चेअरमन) व इतरांनी पाचोड - पैठण रस्त्यावरील नांदर - दावरवाडी (ता.पैठण) फाट्यावर सुर्यतेज अर्बन पैठण मल्टिपल पतसंस्था सुरु केली. येथे अनेकांचे खाते उघडून दैनंदिन ठेव्यासह मुदत ठेवी जमा केल्या. सर्वप्रथम या पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर नारायण जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश नारायण जाधव दोघे, बँकेचे व्हाईस चेअरमन रविंद्र अर्जुन घाडगे व शाखाधिकारी नारायण भिकाजी सोरमारे यांनी ग्राहकांना बारा टक्के व्याजदराने परतावा रक्कम देण्याचे सांगून मुदत ठेव करण्यास प्रोत्साहित केले. यात अनेक छोट्या - मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन तुटपुंज्या व्यवसायातून या पतसंस्थेत पिग्मी खाते उघडून त्यात बचत केली.
हेही वाचा : पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यासाठी सध्या ब्रेक; पोलीस आयुक्तांनी नाकारले 400 अर्ज
काही दिवसानंतर संबंधित संस्था चालकाने ग्राहकांच्या ठेवी परत न करता पतसंस्थेला कुलूपबंद लावून निघून जाण्यात धन्यता मानली. अनेक ग्राहकांनी पाचोड पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. अशातच नांदर येथील मुरलीधर राजाराम काळे (वय 60) यांचा मार्च 2024 मध्ये अपघात झाला. उपचारासाठी त्यांना पैशाची गरज पडल्याने त्यांनी स्वतःच्या नावे पतसंस्थेत ठेवलेली मुदत ठेव रक्कमेची 4 लाख 8 हजार 100 व पत्नीच्या नावे असलेले 1 लाख 21 हजार 900 रुपये परत मिळविण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव, नागेश जाधव दोघे, रविंद्र घाडगे व नारायण सोरमारे यांच्याकडे गेले असता त्यांनी संबंधितांना पैसे देण्यात टाळाटाळ केली. मुरलीधर काळे यांना आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. मात्र कुणी फारसे गांभीर्याने न घेतल्याने मुरलीधर काळे यांनी पैठणच्या न्यायालयात विविध पुराव्यासह पतसंस्थेच्या उपरोक्त चौघांसह अन्य पंधरा जणांविरुद्ध 25 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला असता पैठण येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. आर. कणकदंडे यांनी ता. 17 मे 2025 रोजी पाचोड पोलिसांना अपहार व फसवणूकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. संबंधित आदेशान्वये पाचोड पोलिसांनी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेश जाधव दोघे, बँकेचे व्हा. चेअरमन रविंद्र घाडगे व शाखाधिकारी नारायण सोरमारे यांच्यांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बँकेला टाळे ठोकण्यात आले असून संबंधित सर्वजण गायब असल्याचे दिसले. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अनेक ग्राहक पोलिसांकडे धाव घेत आहेत.
या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडीत व पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते यांनी ज्या ज्या ग्राहकांची फसवणूक झाली असेल त्यांनी निर्भयपणे पाचोड पोलिसांकडे लेखी पुराव्यासह तक्रारी द्याव्यात अथवा मोबाईल क्रमांक 9518388769 वर संपर्क साधावा असे आवाहन केले. या तक्रारीनंतर किशोर दादाराव नेहाले व दिलीप रामनाथ नेहाले दोघे यांनी बुधवारी पुराव्यासह पोलिसांकडे आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहे.