मुंबई : दिव्यातील अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिका हातोडा चालवणार आहे. पालिकेच्या तोडक कारवाईविरोधात नागरिकांचं आंदोलन पाहायला मिळत आहे. महिला आंदोलकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केले आहे.
ठाणे महानगरपालिकेने दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन छेडले आहे. ठाणे पालिकेविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. दिव्याच्या मुख्य चौकातील काही इमारतींवर कारवाई होणार आहे. घर रिकामं करण्यास रहिवाशांचा नकार आहे. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले आहे.
हेही वाचा : PM Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 'या' दिवशी जारी केला जाणार; योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या..
कारवाईचं तेल, 'दिवा' पेटला
आगासन रोडच्या 'अनंत पार्क'वर महापालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. कारवाईविरोधात उच्च न्यायालयाने महापालिकेवर आगपाखड केली आहे. दिव्यात स्थानिक नागरिकांमध्ये कारवाईविरोधात असंतोष दिसून येत आहे. पालिकेविरोधात दोन हात करण्याची नागरिकांची तयारी आहे. यापूर्वी दोनवेळा कारवाई केल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
पालिकेकडून 18 वर्षांनंतर 'अनंत पार्क'वर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. रहिवासी आणि जागा मालकांच्या वादामुळे न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. आमच्या बळीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
'जास्त मोबदल्यासाठी नागरिकांना वेठीस धरणं चुकीचं'
जागा मालक न्यायालयाची फसवणूक करत आहेत. जास्त मोबदल्यासाठी नागरिकांना वेठीस धरणं चुकीचं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया दिवा कारवाईप्रकरणी खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे.