नाशिक: आईपण हे बाईला मिळालेलं सर्वात मोठं सुख. याच आईची गोष्ट नाशिकमधून समोर आली आहे. परीक्षा द्यायला गेलेल्या महिलेने परीक्षा देतांनाच बाळाला जन्म दिला आहे. एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी एक दाम्पत्य नाशिक येथे आले होते. मात्र परीक्षा केंद्रात पोह्चल्यानंतर महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. परंतु पोलीस प्रशासनामुळे सार काही निभावलं. महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. पोलीस प्रशासनाची तत्परता आणि त्वरित उपचारांमुळे परीक्षार्थीं महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
युगंधरा गोरख गायकवाड असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे युगंधरा आणि त्यांचे पती या दोघांचेही परीक्षा केंद्रे वेगवेगळी होती. युगंधरा यांचा कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात, तर त्याचे पती गोरख यांचा रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत परीक्षेचा बैठक क्रमांक होता. युगंधरा यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून गोरख त्यांच्या केंद्रावर पोहोचले. सकाळी नऊ वाजेपासून परीक्षा केंद्रात बसलेल्या युगंधरा यांना पेपर सुरू झाल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही सुरू झाला. यामुळे परीक्षाकेंद्रावर सर्वांचं धास्ती भरली.
या संपूर्ण प्रकाराबाबत केंद्र प्रमुखांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी कसलाही विलंब न करता परीक्षा केंद्रावर पोहचले आणि युगंधरा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. युगंधरा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. या संपूर्ण प्रकारची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सारं काही ठीक झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.