रत्नागिरी: डिसेंबर महिना आला म्हणजे नववर्षाची चाहूल सर्वांनाच लागते वर्ष संपण्याआधी आणि नवीन वर्ष सुरु होताना मंडळी नवीन वर्षाचं वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करतात. कोणी नाताळ सेलेब्रेशनसाठी बाहेर जातं तर कोणी घरचा घरी किंवा मित्रमंडळीसोबत पार्टी करतं. अशातच आता विकेंड आणि नाताळच्या सुट्टीसाठी कोकणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यावर्षी नाताळच्या सुट्टीत पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना जास्त पसंती दिली आहे, आणि या कारणाने कोकणातील समुद्रकिनारे परत एकदा रंगले आहेत. गणपतीपुळे, कर्दे, आणि गुहागर या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकाची वर्दळ पाहायला मिळत आहे.

गणपतीपुळे येथील मंदिराच्या दर्शनासाठी आलेले पर्यटक आता समुद्रकिनाऱ्यांवर मौज-मज्जा करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक खासकरून येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत. कोकणातील सुंदर समुद्रकिनारे, शांतता आणि निसर्गाने भरलेली वातावरण पर्यटकांना खूप आकर्षित करत आहे.

नाताळच्या सुट्टीनंतर रत्नागिरीतील गणपतीपुळे, कर्दे, आणि गुहागर या समुद्रकिनाऱ्यांवर अजून पर्यटकांची वर्दळ असणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना देखील या पर्यटनामुळे चांगला व्यवसाय मिळत आहे. कोकणातील ही पर्यटन वाढीची लाट स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरते आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी कोकणातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स देखील सज्ज झाले आहेत.