Wednesday, August 20, 2025 12:57:16 PM

एका गाभाऱ्यात दोन गणपती; पद्मालयचा अद्भुत चमत्कार, जाणून घ्या..

महाराष्ट्रात गणपतीची साडेतीन शक्तीपीठे आहेत आणि त्यातील एक संपूर्ण पीठ म्हणजे श्रीक्षेत्र पद्मालय आहे.

एका गाभाऱ्यात दोन गणपती पद्मालयचा अद्भुत चमत्कार जाणून घ्या

जुगल पाटील, प्रतिनिधी, जळगाव : महाराष्ट्रात गणपतीची साडेतीन शक्तीपीठे आहेत आणि त्यातील एक संपूर्ण पीठ म्हणजे श्रीक्षेत्र पद्मालय आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसलेले हे तीर्थक्षेत्र आपल्या ऐतिहासिक, पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे पण या मंदिराची एक खासियत आहे, जी संपूर्ण भारतात कुठेही सापडणार नाही. 

जळगाव जिल्ह्यातील हे मंदिर खास आहे कारण इथे गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती एकाच गर्भगृहात विराजमान आहेत. उजव्या सोंडेच्या रूपात गणपतीने सहस्त्रार्जुनास दर्शन दिलं, तर डाव्या सोंडेच्या रूपात शेषनागास दर्शन दिलं असा उल्लेख गणेश पुराणात आहे. या मंदिराचा उल्लेख महाभारतातही आढळतो. एरंडोल म्हणजेच प्राचीन एकचक्रनगरी! पांडव वनवासात असताना या भागात आले होते आणि भीमाने बकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. 
हेही वाचा : Rose Water : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी गुलाब पाणी फायदेशीर जाणून घ्या..

पेशव्यांनी या मंदिराचं विशेष महत्त्व ओळखलं होतं. माधवराव पेशव्यांनी 37 परगण्यांचा महसूल या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी सनद म्हणून बहाल केला होता. पेशवे दप्तरात याची नोंद आहे. पद्मालय हे नावही त्याच्या वैशिष्ट्यावरून पडलं आहे. पद्म म्हणजे कमळ, आणि येथे बाराही महिने कमळ फुललेली असतात. मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 150 वर्षांपूर्वी गोविंदशास्त्री बर्वे यांनी केला. याच मंदिराचा एक खास ऐतिहासिक ठेवा म्हणजे पंचधातूची 11 मण वजनाची प्रचंड घंटा! पूर्वी ही घंटा वाजवली की तब्बल 5 किमी परिसरात तिचा निनाद ऐकू यायचा. येथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचं सुंदर मिश्रण आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून दूरदूरहून लोक इथे दर्शनाला येतात. 

पद्मालय मंदिर परिसरात अजून एक आश्चर्य आहे. येथे असलेले महाकाय दगडी जाते. याचा व्यास तब्बल 4 फूट असून उंची कमरेपेक्षा जास्त आहे. पूर्वीच्या काळी येथे दळण दळले जात असे. पण आज ते हलवणंही अशक्य आहे. या ठिकाणी वर्षभर भक्तांची वर्दळ असते. विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला येथे प्रचंड गर्दी होते. या विशेष दिवशी जळगाव आणि एरंडोल येथून भाविकांसाठी जादा बसेस सोडल्या जातात. श्रीक्षेत्र पद्मालय हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्गरम्य स्थळही आहे. एक दिवसाच्या सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. जिथे भक्तांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. 


सम्बन्धित सामग्री