सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. दत्ता शेळके यांच्या शेतातील जुन्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेले दोन शाळकरी मुले विहिरीची कडा ढासळल्याने विहिरीत अडकली. तब्बल दहा तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर या दोन्ही मुलांचे मृतदेह रात्री उशिरा सापडले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना सोमवार, 1 मे 2025 रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. उन्हाच्या कडाक्यामुळे गावातील काही शाळकरी मुले पोहण्यासाठी शेळके यांच्या विहिरीत गेली होती. अंदाजे 50 वर्षे जुन्या या विहिरीत पोहत असताना अचानक कडा ढासळली आणि दोन मुले आत अडकली. घटनेनंतर इतर मुले ओरडू लागली आणि लगेचच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि ग्रामस्थांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.
हेही वाचा: शक्तीपीठ मार्गाला विरोध का? आमदार दीपक केसरकर यांचा संताप अनावर
बुडालेल्या मुलांची नावे भीमरत्न हरीशचंद्र राजगुरु (वय 14) आणि नैतिक सोमनाथ माने (वय 15) अशी आहेत. दोघेही स्थानिक शाळेत शिक्षण घेत होते आणि सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे घरी होते. दरम्यान, घटनेच्या वेळी विहिरीत असलेल्या अन्य तीन मुलांना ग्रामस्थांनी वेळेवर बाहेर काढून वाचवले.
शोध मोहिमेअंतर्गत विहिरीतील पाणी काढण्यासाठी तीन विद्युत मोटारी, एक शक्ती पंप आणि जेसीबी मशिनचा वापर करण्यात आला. ढासळलेल्या कड्याचा मलबा हटवण्याचे काम सलग चालू ठेवण्यात आले. अखेर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडले आणि गावात शोककळा पसरली. दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विहिरीची अवस्था पाहता त्याचे नूतनीकरण किंवा संरक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट होते.