सोलापूर: अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात हल्लेखोरांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. हल्लेखोरांमध्ये दीपक काटे या सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचा दावा समाजकऱ्यांनी केला आहे.
प्रवीण गायकवाड हे मराठा समाजाच्या प्रेरणास्थानांपैकी एक मानले जातात. त्यांच्यावर शाईफेक व मारहाण झाली असल्याने मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली, तरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप देखील समाजाच्या वतीने करण्यात आला.
हेही वाचा:अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांना काळं फासून निषेध
'आरोपींना दूध देऊन मानपान केला जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही,' असे मत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर, राज्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तशीच कारवाई प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणात देखील व्हावी, अशी मागणी प्रताप चव्हाण (नेते, मराठा समाज) यांनी केली.
जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर अक्कलकोट बंद, सोलापूर जिल्हा बंद आणि आवश्यकता भासल्यास राज्य बंदची हाक दिली जाईल, असा इशारा दिलीप कोल्हे (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा) यांनी दिला आहे. या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, पोलिस आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.