Ambadas Danve, Milind Narvekar, Subhash Desai
Edited Image
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन प्रमुख नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. आज सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. उद्धव ठाकरे गटातील या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. परंतु, स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारककाचे काम सुरू होत असल्याने त्यासंदर्भातील कामासाठी उद्धव गटातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
तब्बल एक तास त्यांची बंद दरवाजाआड चर्चा झाली आणि त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांचे काही प्रमुख नेते सागर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. त्यातच भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना प्रसार माध्यमांनी या भेटीमागील कारण विचारले असता त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विविध प्रश्न हाताळत असतात, त्यामुळे राज्यातील कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता त्यांना भेटू शकतो. उगीचच भेटी मागे वेगळे राजकारण करू नये, असंही लाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला प्रचंड मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेतील काही नेते दुसऱ्या पक्षाकडे गेले होते. त्यामुळेच पुन्हा एकदा असे काही नेते फुटण्याच्या मार्गावर आहेत का? असाही तर्क सुरू असताना या भेटीमुळे सर्वांचे लक्ष वेधले.
हेही वाचा - राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागले होते. महायुतीच्या स्पष्ट बहुमतामुळे तब्बल 237 जागा निवडून आल्याने विरोधी पक्षनेता निवडणे इतके देखील आमदार नसल्याने महाविकास आघाडीचे मोठे अपयश मानले जात होते. त्यातचं आज संजय राऊत यांनी महा विकास आघाडी बद्दल वेगळा विचार करू, असे वक्तव्य केल्याने या भेटीचा काही वेगळा राजकीय अर्थ असू शकतो, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.