मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र कोकणात अवकाळी पाऊस आला आहे. तसेच पावसामुळे नाशिक, संभाजीनगर, पुणे, धुळ्यात शेतीपिकांचं नुकसान झाले आहे. नागपूर, वर्धा, अकोल्यात तर पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
पुण्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यात आलेल्या पावसानं पुणेकरांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच बुधवारी संध्याकाळी अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर- खंदरमाळ परिसर आणि अकोले तालुक्यात अनेक गावात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झाला आहे. तर वाटाणा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे.
नागपुर जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस बरसला आहे. अवकाळी पावसामुळे धान्य मोठ्या प्रमाणात भिजलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी झाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये अवकाळीचा पाऊस बरसला. शेतीचं मोठं नुकसान झालं. पावसामुळे निर्यात होणारी द्राक्षं खराब होण्याची शक्यता आहे. माडसंगवी, ओढा, बागलाण, सटाणामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अकोला जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा बसला आहे. कांदा आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालं. तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी, दानापूर, तळेगाव बाजारसह आदी गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतात तोडणी करून कापणीसाठी ठेवलेल्या कांदा पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
हेही वाचा : वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का?; उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार फटकेबाजी
हवामान विभागाने भंडारा जिल्ह्यात गारपिट, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. बुधवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून आज दिवसभर जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्री वैभववाडी खोऱ्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली. तर आज पहाटेपासून जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागात पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र उखाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा पावसाच्या सरींमुळे गारवा वातावरणात झाल्याने दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच कोकम पिकावर परिणाम झाला आहे.
धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले आहे. धुळे तालुक्यातील नेर गावात सह परिसरात गारपीट होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काढणीला आलेला गहू, हरभरा, मका पिकाला जास्त फटका बसला आहे. पिकं पूर्णपणे आडवी झाल्याने शेतकऱ्याचे पूर्ण नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्रीच्या दरम्यान नांदुरा खामगाव मोताळा तालुक्यात परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे मका, कांदा, ज्वारीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत. सोसाट्याचा वारा असल्याने मोठमोठी झाडे आणि विद्युत पोल कोलमडून जमिनीवर पडली आहेत. राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने लोकांचे नुकसान केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचेही आतोनात नुकसान झाले आहे.