मुंबई: 'पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळताना ज्या भावना मनात उमटतात, त्या शब्दांत मांडणं कठीण आहे,' असं म्हणणारा विराट कोहली अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. भारताच्या क्रिकेट इतिहासात एक तेजस्वी अध्याय लिहून, कोहलीने शांतपणे आणि ठामपणे या यशस्वी प्रवासाचा शेवट जाहीर केला. 14 वर्षांचा कसोटी कारकिर्दीचा प्रवास, हजारो चाहत्यांचे हृदय जिंकणारे खेळ, आणि प्रत्येक सामन्यातला जिद्दीचा आविष्कार; आता केवळ आठवणीत राहणार आहे.
विराटने निवृत्तीची घोषणा करताना भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मला 14 वर्ष झाली. या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची कधीच कल्पना केली नव्हती,' असं तो म्हणाला. कसोटी क्रिकेटने त्याला अनेक कठीण प्रसंगातून घडवलं, आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.
या फॉरमॅटबद्दल बोलताना विराट म्हणतो, 'या फॉरमॅटनं माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव दिले. पांढऱ्या पोशाखात खेळणं हे नेहमीच माझ्यासाठी खास राहिलं.' त्याच्या या भावना त्याच्या प्रत्येक खेळात उमटत होत्या. कसोटी क्रिकेट हे 'खऱ्या' क्रिकेटचं प्रतीक मानलं जातं, आणि कोहलीने त्या कसोटीला पूर्णपणे न्याय दिला.
हेही वाचा: Team India ला मिळणार नवा कॅप्टन? 23-24 मे रोजी समोर येणार नाव; जाणून घ्या सविस्तर
विराट कोहलीची नेतृत्वशैली, आक्रमकता आणि प्रत्येक चेंडूवरची झुंज ही तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली. तो म्हणतो, 'शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही माक्ष ते कायम तुमच्यासोबत राहतात.' हीच कसोटी क्रिकेटची खरी मजा आहे, जी विराटने अनुभवली आणि जगवली.
'मी या फॉरमॅटमधून बाहेर पडतोय मात्र हा निर्णय मला बरोबर वाटतो. माझ्याकडे जे काही होतं ते सर्व दिलंय आणि या फॉर्मेटनं मला अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं,' हे शब्द कोहलीच्या समाधानाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहेत. निवृत्तीचा निर्णय सोपा नव्हता, पण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय, असं तो स्पष्टपणे सांगतो.
कोहलीची ही निवृत्ती चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी असली तरी त्याच्या योगदानाची आठवण कायम क्रिकेटविश्वात राहील. 'मी कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखानं पाहत राहील,' असं सांगताना, कोहलीने हा प्रवास किती प्रेमाने स्वीकारला होता, हे सिद्ध केलं.
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा अध्याय आता संपला असला, तरी त्याचा प्रभाव, त्याची शैली आणि त्याचं योगदान क्रिकेटप्रेमींच्या हृदयात कायम जिवंत राहील.