मुंबई: पाहलगाममधील अमानवी हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त
करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायुदलाने हवेतून अचूक स्ट्राईक करत नऊ दहशतवादी छावण्यांचा नायनाट केला. ही कारवाई केवळ अतिरेक्यांच्या ठिकाणांवर केंद्रित होती, जेणेकरून कोणताही निष्पाप पाकिस्तानी नागरिक अथवा लष्करी ठिकाण लक्ष्य ठरणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांना मोठा फटका बसला आणि अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले आणि याच निर्णयक्षमतेचे आणि भारतीय सैन्याचे देशभर कौतुक होत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर बोचरी टीका केली त्यांनी थेट मोदींना देखील सुनावलं
पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा केंद्र सरकाराला अद्याप शोध लागला नाही. आणि आतापर्यंत दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील,असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत.
पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? राज ठाकरे यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ती टोकाची आणि दिशाभूल करणारी असल्याचे मत मांडले. त्यांच्या मते, अशा घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी युद्ध किंवा एअर स्ट्राईक हा उपाय योग्य नाही. राज ठाकरे म्हणाले की, अमेरिकेसारख्या देशाने ट्विन टॉवरवरील हल्ल्यानंतर थेट संबंधित दहशतवाद्यांना शोधून ठार केले, पण त्यांनी युद्धाचा मार्ग निवडला नव्हता. त्यामुळे त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. पाकिस्तान आधीच मोडकळीस आलेला देश आहे, त्याला पुन्हा उद्ध्वस्त करून फारसा फरक पडणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
हेही वाचा: पाकड्यांची टरकली, 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक, 'ऑपरेशन सिंदूर' सक्सेसफूल
राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि सुरक्षा व्यवस्थेवरही टीका केली. त्यांनी विचारलं की, दरवर्षी हजारो पर्यटक पहलगामला जातात, मग अशा महत्त्वाच्या पर्यटनस्थळी पुरेशी सुरक्षा का नव्हती? हल्लेखोर अजूनही सापडलेले नाहीत, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ एअर स्ट्राईक करून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण यामुळे मूळ समस्या सुटत नाही. दहशतवाद्यांना शोधून काढणं आणि त्यांचं पूर्णपणे उच्चाटन करणं हेच खरे प्रत्युत्तर आहे, असं ते म्हणाले.
सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरही त्यांनी थेट सवाल उपस्थित केले. त्यांनी सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान सौदी अरेबियात होते. ते भारतात परत आले, पण थेट बिहारच्या प्रचारसभेला गेले. नंतर केरळमधील अदानींच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि फिल्म इंडस्ट्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे सर्व टाळता आलं असतं. देशात एवढी गंभीर परिस्थिती असताना, अशा कृतीमुळे चुकीचा संदेश जातो, हे सरकारने समजून घेतलं पाहिजे, असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा: Operation Sindoor: पहलगामचा बदला,भारताचा पाकिस्तानात एअर स्ट्राईक; ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?
नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतायत. ते येतायत कुठून? का येतायत? लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलत आहात, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरे म्हणाले.