अमरावती: अमरावतीच्या मेळघाट आणि चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. पाच गावांमध्ये टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही, तर काही भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आकी, खडीमल, मोथा, तारूबांदा आणि लवादा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून, प्रशासनाला टँकरच्या संख्येत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राबवण्यात आलेल्या जलजीवन मिशन आणि घरघर पाणी योजना या योजना मेळघाटात निष्प्रभ ठरल्या आहेत. स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने 14 तालुक्यांतील 395 हातपंपांपैकी 14 पंप निकामी झाले आहेत, तर केवळ चार हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली आहे. भूजल पातळी खालावल्याने अनेक विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक महिलांना डोक्यावर हंड्या घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे समस्या अधिकच बिकट होत असून, महिलांसह संपूर्ण गावकऱ्यांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.