नालासोपारा: नालासोपाऱ्यातील एका थरकापजनक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. प्रेमात अंध झालेल्या एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह थेट घरातच फरशांखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपाऱ्यातील बिलालपाडा परिसरात ही घटना घडली असून, मृत व्यक्तीचं नाव विजय चौहान (35) असं आहे.
विजय मागील 15 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते, पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी गडगपाडा परिसरातील विजयच्या राहत्या घरात फरशांवर लक्ष दिलं. काही फरशा नव्या होत्या, त्यांचा रंग वेगळा दिसत होता. संशय येताच त्यांनी त्या उचलल्या आणि त्यातून दुर्गंधी सुटू लागली. तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं आणि मृतदेह शोधून काढण्यात आला. मृतदेह इतक्या काळ जमिनीत गाडलेला असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती.
या प्रकरणात विजयची पत्नी कोमल चौहान आणि तिचा शेजारी मोनू शर्मा हे दोघे मुख्य आरोपी आहेत. कोमल आणि मोनू यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. दोघांचे घर एका चाळीतच होते. कोमल विवाहित असूनही तिचं मोनूसोबत सूत जुळलं आणि त्यांच्या नात्याचा अडसर ठरत असलेल्या विजयचा कायमचा काटा काढण्याचा त्यांनी प्लान केला. विजय आणि कोमलला आठ वर्षांचा मुलगाही आहे, पण त्या नात्यालाही तिनं पायदळी तुडवलं.
विजयची हत्या करून त्यांनी त्याचा मृतदेह घरातच गाडला. दरम्यान कोमल आणि मोनू दोघेही अचानक बेपत्ता झाले. कोमलने शेजाऱ्यांना सांगितलं होतं की बाथरूम चोकअप झाल्यामुळे खोदकाम चालू आहे, त्यामुळे घरात कामगार आले आहेत. मात्र कोणालाही त्या खोदकामामागील खरी कथा कळली नव्हती. विजयच्या भावाने फरशांमधील फरक ओळखल्यामुळे अखेर हा कट उघड झाला.
सध्या पेल्हार पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आरोपी कोमल आणि मोनू अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी तपास करत आहेत. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून सुडाच्या थरकापजनक रूपात वळण घेतलेल्या या घटनेनं चित्रपटातील ‘दृश्यम’लाही लाजवेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.