Building Collapses In Thane: ठाणे जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंब्रा परिसरातील दौलत नगर येथील लकी कंपाउंडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळून एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांची सून गंभीर जखमी झाली.
पॅरापेट कोसळल्याने अपघात
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रात्री 12:36 वाजता घडली. चार मजली इमारतीतील एका फ्लॅटच्या पॅरापेटचा काही भाग अचानक कोसळून खाली रस्त्याने चालत असलेल्या दोन महिलांवर पडला. यामध्ये इल्मा जेहरा जमाली (26) गंभीर जखमी झाली, तर तिची सासू नाहिद जैनुद्दीन जमाली (62) यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघीही त्याच परिसरातील साना टॉवर येथील रहिवासी होत्या. जखमी सुनेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Nagpur Wall Collapsed : नागपूर हादरलं! 130 वर्ष जुनी भिंत कोसळली; 3 कार दबल्या
धोकादायक घोषित केलेली इमारत
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुर्घटना झालेली इमारत नागरी संस्थेने ‘C2B’ श्रेणीत धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही भाग वापरात असल्याने अपघात घडला. घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ परिसर सुरक्षित केला आणि इमारत रिकामी करण्याचे काम हाती घेतले. रहिवाशांना नातेवाईकांकडे किंवा पर्यायी ठिकाणी हलविण्यात आले असून, परिसर सील करण्यात आला आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, कुठे मुसळधार, तर कुठे यलो अलर्ट जारी
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंब्रा परिसरात अशा धोकादायक इमारतींचे प्रमाण मोठे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा महानगरपालिकेकडून इशारे दिल्यानंतरही काही इमारतींमध्ये लोक राहत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.