Stock Market Holiday: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या महिन्यात भारतीय शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणखी एक दिवस बंद राहणार आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. म्हणजेच, त्या दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरिंग (एसएलबी) सेगमेंटमध्ये ट्रेडिंग बंद राहील.
गणेश चतुर्थीला शेअर बाजार बंद राहणार -
देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी 27 ऑगस्ट रोजी आहे. या निमित्ताने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गुरुवार, 28 ऑगस्टपासून पुन्हा नियमित व्यवहार करू शकतील. ऑगस्ट 2025 मध्ये शेअर बाजाराला दुसऱ्यांदा ब्रेक मिळणार आहे. यापूर्वी, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या महिन्यात दोन दिवस शेअर बाजार बंद राहिला आहे.
हेही वाचा - Gold Rate Today : सर्वसामान्यांना दिलासा ; गणेशोत्सवात सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या
कमोडिटी आणि चलन बाजारावरही परिणाम
शेअर बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटदेखील 27 ऑगस्ट रोजी बंद राहील. म्हणजेच, गुंतवणूकदारांना त्या दिवशी शेअरसोबतच कमोडिटी आणि चलन व्यवहारही करता येणार नाहीत. गुंतवणूकदारांसाठी स्टॉक मार्केट हॉलिडेज कॅलेंडर खूप महत्त्वाचे ठरते. कारण त्यावर आधारितच ट्रेडिंगचे नियोजन केले जाते. BSE आणि NSE दरवर्षी सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करतात, ज्यामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या, धार्मिक सण तसेच विशेष प्रसंगांचा समावेश असतो.
हेही वाचा - ATM New Rules : आता फक्त इतकेच व्यवहार मोफत करता येणार, जाणून घ्या नवीन नियम
पुढील काही महिन्यांतील महत्वाच्या सुट्ट्या -
शेअर बाजाराच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, येत्या काळातही बाजार काही दिवस बंद असेल. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व दसरा, 21 ऑक्टोबरला दिवाळी लक्ष्मी पूजन, 22 ऑक्टोबरला दिवाळी बलिप्रतिपदा, 5 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि 25 डिसेंबरला ख्रिसमस या दिवशी NSE आणि BSE बंद राहतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आगामी व्यवहारांची आखणी करताना या सुट्ट्यांचा विचार करणे आवश्यक आहे.