मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 20 जुलै 2025 रोजी म्हणजेच रविवारी महत्त्वाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या ब्लॉकच्या काळात मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांमध्ये बदल केले जाणार असून, काही सेवा रद्दही राहणार आहेत.
CSMT ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे.
या कालावधीत सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत CSMTहून सुटणाऱ्या डाउन धीम्या लोकल ट्रेनना डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहारपासून पुन्हा त्यांच्या मूळ धीम्या मार्गावर धावतील.
तसेच, घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल ट्रेनना विद्याविहार ते CSMT दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.
हार्बर मार्गावरही ब्लॉक आणि सेवा रद्द
CSMT - चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक राहणार आहे.
यादरम्यान, CSMTहून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 दरम्यान सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील ट्रेन आणि सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
विशेष सेवा आणि पर्यायी मार्ग
या ब्लॉकच्या दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील.
तसेच, हार्बर मार्गावरील प्रवाशांनी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत मुख्य मार्ग किंवा पश्चिम रेल्वे मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रशासनाची माफी आणि आवाहन
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा प्रकारचे देखभाल व सुधारणा मेगाब्लॉक्स हे सेवेच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीसाठी प्रशासन खेद व्यक्त करत असून, प्रवाशांनी आपला प्रवास नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन केले आहे.
रविवारी प्रवास करणाऱ्यांसाठी सूचना:
आपल्या ट्रेनच्या वेळापत्रकाची आधीच माहिती घ्या
पर्यायी मार्गाचा वापर करा
गर्दी टाळण्यासाठी वेळेआधीच प्रवास करा
अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या सूचना वाचाव्यात
रविवारी मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी संयम आणि योग्य नियोजनाची गरज आहे.